

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी मंडळात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. या परिसरात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपून गेली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीपाची पिके हातची गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
टेंभुर्णी महसूल कृषी मंडळातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. यामध्ये टेंभुर्णी, पापळ, नेर, कुंभारझरी, कोल्हापुरी, देऊळगाव गव्हाडे, माहोरा, अकोला या गावांचा समावेश आहे. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी २०१७-१८ पासून पीक कर्ज थकित असतानाही सोने ग्रहाण ठेवून तसेच काही शेतकर्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन खरिप हंगामाची पेरणीपूर्ण केलेली आहे.
जुलै महिन्यात पाऊस झाल्याने खरिप हंगामातील पीके जोमात आली होती. परंतू ऑगस्ट महिन्यापासून पावसाने खंड दिल्याने खरिप हंगामातील पिके करपू लागली आहे. यामुळे टेंभुर्णीसह तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
लागवड केलेला खर्चही निघणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. पाऊस नसल्याने खऱिपापाठोपाठ रब्बी हंगाम ही हातच्या जाण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. शासनाकडून शेतकर्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
या मागण्या
शासनाने तातडीने टेंभुर्णी मंडळाचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करावा. शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी पीक विमा कंपनीनेही तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. थकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
पिके करपू लागली
जून महिन्यापासून तुरळक पाऊस पडला असून दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. धरणे कोरडी ठाक पडली आहेत. पेरणी केलेले सोयाबीन, कापूस, मका ही पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत.