

Suspicious body of a young man found in a private hospital.
जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील मंठा चौफुली परिसरात असलेल्या गजानन हॉस्पीटल येथे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमोल राजेंद्र दोडके असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मयत अमोल याची आई लता राजेंद्र दोडके यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि, अमोल हा मंठा चौफुली येथील संत गजानन हॉस्पीटल येथील ऑपरेशन थिअटर मध्ये काम करीत होता. या कामाचा त्याला तब्बल १५ वर्षांचा अनुभव होता. शनिवारी सकाळी तो ड्युटीवर गेला होता. ड्युटी संपुनही तो घरी न परतल्याने त्याच्या मोबाईलवर कॉल केले मात्र ते त्याने उचलले नाही.
त्यानंतर त्याची नाईट ड्युटी असावी असे समजुन आम्ही रविवारी सकाळ पर्यंत वाट पाहीली. मात्र तो घरी न आल्याने हॉस्पीटलमधे जावुन पाहिले असता त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला निदर्शनास आला. अमोलचा मृत्यु हा घातपात असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हॉस्पीटलमध्ये अमोलच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अमोलच्या मृत्युबाबत हॉस्पीटल प्रशासनाकडुन कोणतीही माहीती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात न आल्याने या घटनेमागचे गुढ वाढले आहे. पोलिस सर्व बाजुंनी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले.
शवविच्छेदनानंतर कारण समजेल
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल असे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.