

जाफराबाद (जालना) : तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून नद्यांमध्ये कायम पाण्याची पातळी टिकून राहिल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडीकडे वळले आहेत. पूर्णा, खेळणा व धामणा या तीनही नदीपात्रांमध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे पाणी तुडुंब आले. परिणामी २५ किलोमीटर अंतरावरील संत चोखा धरण जून-जुलैमध्येच भरून वाहू लागले व धरणाचे बॅकवॉटर झिरो पॉईंटपर्यंत पोहोचले.
कापूस व सोयाबीनच्या लागवडीचा वाढता खर्च, मजुरांची मुजोरी आणि शासन खरेदी प्रक्रियेचे किचकट स्वरूप यामुळे शेतकरी दोन वर्षे तोट्यात गेले. सोयाबीन सोंगणीला मजुरांकडून अव्वाच्या सव्वा मजुरी आकारली गेली, तर कापूस वेचणी ६०-७० रुपये चार किलो या दराने झाली. मक्का पिकाचीही परिस्थिती अशीच राहिली. शेतकरी तेराशे-पंधराशे रुपये क्विंटल दराने व्यापाऱ्यांकडे मक्याची विक्री करून मोकळे होत आहेत. खरिपातील या तीनही पिकांचा खर्च उत्पन्नाचा ताळेबंद पाहता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या पार्श्वभूमीवर नदीकिनारीचा शेतकरी पट्टा यंदा ऊसाने व्यापला आहे. जाफराबाद, खामखेडा, नळविरा, हिवरा, आळंद, कुंभारझरी, ब्रह्मपुरी, निमखेडा, शिपोरा आदी गावांत ऊस लागवड वाढली असून जानेवारी अखेर या भागातील ऊसतोड जवळपास पूर्ण होईल, असे चित्र दिसत आहे. ऊसाला प्रति टन ३,१०० रुपये दर जाहीर करण्यात आला असून अन्य पिकांच्या तुलनेत ऊस पीकात अधिक नफा मिळत आहे.
पाण्याचा फायदा
एकंदरीत, चोखामेळा धरणाचे तुडुंब बॅकवॉटर हे नदीकाठी १५-२० गावे ऊसपट्ट्यात रूपांतरित होण्याचे प्रमुख कारण ठरले असून जाफराबाद तालुक्यात 'ऊस क्रांतीचे' नवे चित्र वेगाने उमटत हे नदीकाठी १५-२० गावे ऊसपट्ट्यात रूपांतरित होण्याचे प्रमुख कारण ठरले असून जाफराबाद तालुक्यात 'ऊस क्रांतीचे' नवे चित्र वेगाने उमटत आहे.
ऊस लागवड सुरू
ब्रह्मपुरी येथील जगनराव शेवत्रे व टीम ऊस लागवडीसाठी 'एकरप्रमाणे रक्कम' घेऊन सेवा देत आहेत. "आम्ही आतापर्यंत जवळपास १०० एकरांवर ऊस लागवड केली असून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत लागवड प्रक्रिया सुरू राहील," अशी माहिती त्यांनी दिली.