

Sugarcane burnt due to short circuit, incident in Mantha Shivara
मंठा, पुढारी वृत्तसेवा : शिवारातील गट नंबर २७७ मधील शेतात असलेल्या रोहित्राचा स्फोट होऊन अल्पभूधारक शेतकऱ्याचा अंदाजे दहा लाखाचा ऊस आगीच्या भस्मस्थानी पडला. ही घटना बुधवारी (दि. ३) रोजी दुपारच्या सुमारास घडली.
शेतकरी आबासाहेब बोराडे आणि लक्ष्मण बोराडे यांनी विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दुपारच्या वेळी मंठा शिवारातील गट नंबर २७७ मधील शेतात असलेल्या विद्युत रोहित्राचा अचानक स्फोट झाला त्यामुळे आबासाहेब मारोतराव बोराडे आणि लक्ष्मण मारोतराव बोराडे यांच्या शेतातील सहा एकर ऊस पूर्णपणे जळून आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले. बोराडे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेती व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
विद्युत वितरण कंपनीने शेतात उभ्या केलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे मोठे नुकसान झाले असून विद्युत वितरण कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
उपोषणाचा इशारा
नुकसान भरपाई न दिल्यास विद्युत वितरण कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी महसूल विभागाकडून तलाठी चिंचोले यांनी पाहणी करून पंचनामा केला.