

sambhajinagar OBC reservation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : वंचित (बलुतेदार, अलुतेदार) मागास ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा, तसेच ओबीसी आर-क्षणाबाबत तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करावी, या मागण्यांसाठी वंचित ओबीसी संघर्ष समिती आक्रमक झाली असून, गुरुवारी (दि.४) समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देत मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा नसता समितीकडून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १५ डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक नाईक यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारमधील नेते, आमदार, मंत्री तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना निवेदने दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. २७ ऑक्टोबर रोजी जिजाऊ चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करून शासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजाची व्यापक बैठक घेऊन १५ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय समितीने जाहीर केला आहे. आरक्षणातील अन्याय थांबवून वंचित घटकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही देण्यात आला.
या आहेत समितीच्या मागण्यात...
वंचित ओबीसी घटकांचा एसटी प्रवर्गात समावेशकरावा.
ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका व बिंदूनामावलीची चौकशी करावी.
शिक्षण व नोकरीत विशेष सवलत देण्यात यावी.
स्वतंत्र उपवर्ग निर्मिती करावी.
समाजासाठी सक्षम आर्थिक महामंडळ स्थापन करून ५०० कोटींची तरतूद आणि १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.