Stray dogs menace : धावडा गावात भटक्या कुत्र्यांचा वाढता धुमाकूळ

नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
Stray dogs menace
भोकरदन : धावडा गावात कळप करून फिरताना pudhari photo
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील धावडा गावात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, गावातील विविध भागांत कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. मुख्य रस्ते, शाळा परिसर, अंगणवाडी, बाजारपेठ, मंदिर परिसर तसेच वस्ती भागात दिवसरात्र कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी-सायंकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा कुत्र्यांचे कळप दुचाकीस्वारांच्या मागे धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच अचानक कुत्रे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना ब्रेक लावावे लागत असून, गंभीर अपघात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Stray dogs menace
Dhavda waterfall : धावडा परिसरातील धबधबा खळाळला

रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर होत असून, नागरिकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटत आहे. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी कुत्र्यांनी पाठलाग करणे, अंगावर धावून येणे तसेच चावण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनाही घडल्याचे सांगितले आहे.

Stray dogs menace
Chhatrapati Sambhajinagar crime : वृद्धांना लुटणाऱ्या तोतयाचा मेव्हणाही गजाआड; जवाहरनगरात लुटलेली ३ तोळ्यांची चेन जप्त

या वाढत्या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नियमानुसार त्यांची मोजणी, निर्बीजीकरण व लसीकरणाची मोहीम राबवावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

"धावडा गावात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुत्र्यांचे कळप रस्त्यावर फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी.

मजहर पठाण, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news