

Stop making a mockery of farmers: Former MLA Danve
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मोठ्या गाजावाजासह जाहीर = केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' ही प्रत्यक्षात कर्जमाफी नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी, फसवणूक करणारी आणि कर्जवसुलीची योजना असल्याचा घणाघाती आरोप करत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा बंद करा, असा इशारा माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी दिला आहे.
यासंदर्भात माजी आमदार दानवे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि. १२ रोजी तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला.
एका बाजूला शेतीचा खर्च दुपटीने वाढत असताना दुसऱ्या बाजूला शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारने मदतीचा हात देण्याऐवजी कर्जमाफीच्या नावाखाली जाचक अटी लादून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
२०१९ च्या कर्जमाफीचा लाभघेतलेल्या सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभदेणे म्हणजे उघड अन्याय आहे. सरकारने शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करण्याचे काम केले आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देणारे सरकार आता अटी-शर्तीच्या जाळ्यात शेतकऱ्यांना अडकवत आहे. आधी लाखो रुपयांची थकबाकी भरा आणि मग कर्जमाफीचा लाभ घ्या, ही अट म्हणजे गरीब शेतकऱ्यांची थट्टाच आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दुष्काळ, अवकाळी, महागाईने शेतकरी उद्ध्वस्त
गेल्या तीन वर्षांपासून जालना जिल्ह्यात सततची नापिकी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, वाढते उत्पादन खर्च, खत-बियाण्यांच्या वाढलेल्या किमती आणि शेतीमालाला न मिळणारा हमीभाव यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने सरसगट कर्ज माफ करावे.