

Stolen iron angles seized
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील सेंट मेरी शाळेजवळील वनविभागाच्या संरक्षण जाळीसाठी लागणारे ४० लोखंडी अँगल चोरून नेण्यात आले होते. त्यातील ३२ अँगल सदर बाजार डीबी पथकाने जप्त केले.
छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवर राहणाऱ्या अनिकेत बालासागर तौर याने वनविभागाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या संरक्षण जाळीचे काम घेतले होते. २७ ऑगस्ट रोजी त्यांनी जालना शहरातील सेंट मेरी शाळेज-वळील वनविभागाच्या संरक्षण जाळी साठी लागणारे ४० लोखंडी अँगल जमिनीमध्ये रोवल्यानंतर ते काम बंद करून घरी गेले होते.
दुसऱ्या दिवशी पुन्हा ते कामाच्या साईटवर आले असता त्यांना संरक्षण जाळीसाठी रोव लेले लोखंडी अँगल दिसून आले नाही. या प्रकरणी त्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सदर बाजार पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक म्हस्के यांना खबऱ्याने माहिती दिली की, सदर अँगल हे लालबाग येथील संशयित शेख सोहेल शेख इसाक याने चोरले आहेत. पोलिसांनी संशयिताकडे विचारणा केली असता त्याने सदर अँगल चोरल्याची कबुली देत ते लालबाग जवळील नाल्याच्या वर असलेल्या एका गोडाऊनमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरीस गेलेल्या लोखंडी अँगलपैकी ३२ लोखंडी अँगल आरोपीचे ताब्यातून जप्त केले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डी. बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, भरत आगळे, भगवान मुंजाळ, दुर्गेश गोफणे, अजिम शेख, गणेश तेजनकर, राहूल कटकम, लोढे व चालक हिवाळे यांनी केली.