

घनसावंगी ( जालना ) : अविनाश घोगरे
तालुक्यातील ढाकेफळ गावचा दिपक चांदर हा तरुण आज संपूर्ण परिसरात 'सर्पमित्र' म्हणून परिचित झाला आहे. गावागावात साप निघाल्याची बातमी समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते; मात्र अशा प्रसंगी दिपक चांदर हा कोणतीही भीती न बाळगता तत्काळ घटनास्थळी पोहोचतो आणि मानव तसेच साप दोघांचाही जीव सुरक्षित ठेवतो.
साप म्हणजे केवळ भीतीचे प्रतीक नसून निसर्गसाखळीतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, ही जाणीव दिपक चांदर आपल्या कृतीतून ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. सन २०१२ पासून आजपर्यंत त्यांनी सुमारे ५ हजार ५०० हून अधिक विषारी व बिनविषारी सापांना सुरक्षितरीत्या पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
घराच्या अंगणात, स्वयंपाकघरात, शेतशिव-ारात, गोठ्यात किंवा कडेलोटाच्या भागात आढळणारे कोब्रा, मण्यार, अजगर, धामण यांसारखे साप ते अत्यंत संयमाने व कौशल्याने हाताळतात. साप दिसताच ठार मारण्याची मानसिकता ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर आढळते. मात्र दिपक चांदर यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे ही मानसिकता हळूहळू बदलू लागली आहे. साप हे उंदीर खाऊन शेतातील पिकांचे संरक्षण करतात; त्यामुळे साप मारणे म्हणजे शेतकऱ्यांचेच नुकसान होय.
'सापांना मारण्यापेक्षा त्यांना वाचवणे हेच माझे ध्येय आहे. साप हा निसर्गसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो शेतकऱ्याचा मित्र आहे. लोकांनी भीतीपोटी सापांना मारू नये, तर तज्ज्ञ सर्पमित्राला बोलवावे, असे माझे आवाहन आहे.
दिपक चांदर, सर्पमित्र