

Shadow of drought over Pola festival shopping
जालना, पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांचा पारंपारिक आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळ्याची तयारी जिल्ह्यात सुरू झाली असून, गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या पोळ्यानिमित्त जालना शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये बुधवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य, गोंडे, झुली, रंग, दोर, शिंगांना लावण्यासाठी रंग तसेच पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते.
पोळ्याच्या आदल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने खांदे मळणी करण्यात आली. मात्र, यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे या उत्सवावरही पाणीटंचाईचे सावट दिसून आले. अनेक गावांमध्ये बैलांना धुण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या मर्यादित पाण्यातच बैलांची स्वच्छता करावी लागली. काही ठिकाणी तर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना दूरवरून पाणी आणावे लागल्याचे चित्र होते.
दरवर्षी पोळ्याच्या निमित्ताने बैलांना स्वच्छ धुऊन, त्यांची शिंगे रंगवून, अंगावर आकर्षक झुली व सजावटीचे साहित्य चढविले जाते. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. मात्र, यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेती आणि पाण्याचे संकट गंभीर झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्साहावरही दुष्काळाची छाया पडली आहे.
दरम्यान, बाजारात बैलांच्या सजावटीच्या साहित्याला चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक साहित्याबरोबरच नवीन आकर्षक सजावटीच्या वस्तूंचीही खरेदी केली. आर्थिक अडचणी असतानाही वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी पोळ्याची तयारी करत आहेत.