

जालना : जालना जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा योजनेच्या घोटाळ्याची रहस्यमयी कहाणी संपता संपेना. आता पुन्हा नवा ट्वीस्ट या घोटाळ्याच्या निमित्ताने पुढे आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यायाच्यावतीने कथित घोटाळा प्रकरणी दोन लेखाधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र सदर बाजार पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, जालना जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अर्थात पोकरा योजनेत भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी केला. मध्यंतरी या प्रकणाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले होते. कृषीमंत्र्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते.
आता कृषी विभागाच्या दोन लेखाधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, याबाबत जालना येथील उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी सदर बाजार पोलिसांना पत्र दिले आहे. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवून गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती यांनी सांगितले.
पोकरा योजनेतून जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात 3 हजार 258 शेडनेटगृहे उभारण्यात आली होती. मात्र, या योजनेत तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण आणि इतर चार अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी केली होती.
या प्रकरणी शीतल चव्हाण यांना मागील वर्षी निलंबित करण्यात आले असून जिल्ह्यातील या योजनेची पुन्हा एकदा 18 अधिकाऱ्यांच्या 38 पथकांनी झाडाझडती घेतली. दरम्यान, यानंतर आता कृषी विभागाकडून या घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून शनिवार, 6 डिसेंबर रोजी जालना येथील उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे आता पोकरा घोटाळ्यात आणखी काही अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.
याबाबत सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना विचारले असता पत्र आलेले असून प्रकरण थोडे किचकट असल्यामुळे वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवण्यात आले असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यानंतर नावे समोर येतील. पोलिसांनी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवले आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल.
250 कोटींचा घोटाळ्याचा दावा
पोकरा योजनेत 250 कोटींचा घोटाळा केल्याचा दावा तक्रारदार सुरेश गवळी यांनी केलेला असून या प्रकरणात आतापर्यंत शीतल चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. दरम्यान, आता कृषी विभागातील दोन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसात पत्र देण्यात आलेले असल्यामुळे ते दोन कर्मचारी कोण ? याबाबत चर्चेला उधाण आले असून कृषी विभागात खळबळ उडाली आहे.