

'Search for gold' in the dry Godavari river
अविनाश घोगरे
घनसावंगी : उन्हाच्या तीव्र झळांमुळे गोदावरी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले असताना अंबड तालुक्यातील गोंदी परिसरात एक अनोखे चित्र पाहायला मिळत आहे. नदीपात्रातील वाळूतून सोने-चांदीचे दागिने, प्राचीन नाणी आणि ऐतिहासिक वस्तू मिळत असल्याच्या चर्चेमुळे दररोज शेकडो नागरिक खजिन्याच्या शोधात नदीकाठ गाठत आहेत. परिणामी, गोदावरीचे कोरडे पात्र सध्या 'सोन्याची खाण' ठरत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांसह आसपासच्या गावांतील महिला, पुरुष आणि मुले हातात फावडे, कुदळ, खुरपे घेऊन नदीपात्रातील वाळू चाळताना दिसत आहेत. भर उन्हात तासन्तास मेहनत करूनही नागरिक खजिन्याच्या आशेने नदीत ठाण मांडून बसत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांच्या हाती प्राचीन नाणी आणि चांदीच्या वस्तू लागत असल्याने या शोधमोहीमेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, नदीपात्रातून निजामकालीन, ब्रिटिशकालीन तसेच १८ व्या आणि १९ व्या शतकातील नाणी मिळत आहेत. काही नागरिकांना चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूही सापडल्या आहेत. त्यामुळे अनेकांसाठी हा शोध केवळ छंद न राहता उत्पन्नाचा एक पर्याय बनू लागला आहे.
या शोध मोहिमेत भूमिहीन मजूर, ऊसतोड कामगार, मच्छीमार आणि भटक्या समाजातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक कुटुंबांसाठी नदीपात्रात सापडणारे एखादे नाणे किंवा दागिना दिलासा देणारा ठरत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक कुणाल किशोर परासे यांनी सांगितले की, अनेकदा दिवसभर कष्ट करूनही हाती फारसे काही लागत नाही. मात्र, काहीतरी मौल्यवान सापडेल या आशेने लोक येत आहे.
यापूर्वीही सापडले होते अवशेष
सुमारे दहा वर्षांपूर्वी याच परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातून एका प्राचीन बुडालेल्या नौकेचे अवशेष सापडले होते. त्यावेळी प्रशासनाने ते ताब्यात घेतले होते. त्यामुळे नदीपात्रात ऐतिहासिक वारसा दडलेला असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. सध्या गोदावरीच्या कोरड्या वाळूत सुरू असलेली ही 'खजिना शोध मोहीम' परिसरात कुतूहलाचा विषय ठरली असून शेकडो कुटुंबांसाठी आशेचा किरण बनली आहे.
धार्मिक, परंपरेशी संबंध
गोदावरी नदीच्या या तीराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. वर्षभर येथे विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि अंत्यसंस्कार होत असतात. भाविकांकडून अर्पण करण्यात आलेली नाणी, दागिने तसेच विसर्जित राखेसोबत नदीत गेलेल्या मौल्यवान वस्तू कालांतराने वाळूखाली साचल्याचे जाणकारांचे मत आहे.