

तीर्थपुरी/ घनसावंगी : शेत-पाणंद रस्ते ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत विनाअडथळा पोहोचावा आणि दळणवळणाची सोय व्हावी, या उद्देशातून समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी शेतरस्ते खुले करण्याची मोहीम नव्या गतीने पुन्हा सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत सोमवारी शिंदेवडगाव आणि शेवगळ तांडा येथील शेत-पाणंद रस्त्यांच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून घनसावंगी, अंबड व जालना तालुक्यात सन 2023-24 या काळात 205 किमी रस्ते समृद्धी कारखान्याने स्वखर्चातून तयार केले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांमधील आपसातील वाद मिटवून हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यांमुळे हजारो शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची अडचण दूर झाली आहे.
गाळप हंगाम 2024-25 मध्ये या कामांचा मोठा फायदा ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला झाला असून, लाखो मेट्रिक टन ऊस विनाअडथळा कारखान्यापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, समृद्धी साखर कारखान्याने रस्ते खुले करण्याची मोहीम पुन्हा सुरू केली असून, सतीश घाटगे यांच्या हस्ते सोमवारी शेवगळ तांडा ते रांजणी रेल्वे स्टेशन रस्ता (3.5 किमी) आणि शिंदेवडगाव ते आवलगाव (2 किमी) या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ते दर्जेदार करणार ः घाटगे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून समृद्धी कारखान्याने तयार केलेल्या 205 किमी रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हे रस्ते अधिक दर्जेदार होतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यातून घनसावंगी, अंबड आणि जालना तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न असल्याचे याप्रसंगी सतीश घाटगे यांनी सांगितले.