

Sant Muktai Palkhi resting in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा : विठ्ठल,, विठ्ठल,, जय हरी, विठ्ठल..., ज्ञानोबा.., माऊली तुकाराम .... मुक्ताई,, मुक्ताई..., असा हरिनामाचा गजर करत आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे निघालेल्या संत मुक्ताईच्या पालखीचे सोमवारी (दि.१६) सकाळी पांजराप-ोळ गौशाळेत आगमन झाले. वारकऱ्यांच्या सेवेत साडेचार दशकांची परंपरा कायम राखत यंदाही गौशाळेच्या विश्वस्तांनी उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली. हजारो भाविकांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालख्यांमध्ये मानाचे स्थान असलेल्या मुक्ताईच्या पालखी सोहळ्यास ३१६ वर्षांची परंपरा आहे. मागील ४६ वर्षांपासून पांजरापोळ गोशाळेत पालखीच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. मुक्ताईनगर येथून विविध रंगांच्या फुलांनी सजवलेल्या पालखीत संत मुक्ताई चा मुखवटा, अश्व हातात भगवी पताका टाळ मृदंग घेऊन हरिनामाचा गजर करणारे १५०० महिला व वारकरी सहभागी झाले आहेत.
खानदेश, विदर्भानंतर जालना शहरात रविवारी मुक्काम झाला. सोमवारी सकाळी पांजरापोळ गौशाळा परिसरात आगमन होताच अध्यक्ष उद्योजक घनश्यामदास गोयल, उपाध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, कोषाध्यक्ष विजयकुमार कामड, यांनी विधीवत पूजन करून त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
दिंडीत सहभागी दीड हजार वारकऱ्यांसह दर्शनास आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अध्यक्ष घनश्यामदास गोयल, उपाध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, सचिव कैलाश बियाणी, कोषाध्यक्ष विजयकुमार कामड, माजी अध्यक्ष बनारसीदास जिंदल, विश्वस्त सुभाषचंद्र देविदान, संजय लाहोटी, महेंद्रकुमार भक्कड, विजयकुमार राठी, अनिल सोनी, सीताराम अग्रवाल, संजय गवडे, पशुसंवर्धन उपायुक्त चौधरी, डॉ. ढिल्पे, डॉ. सतीश गोयल, प्रा. सत्संग मुंढे, यांच्यासह महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.