

Sanjay Shirsat meet Manoj Jarange
वडीगोद्री: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची आज (दि. १६) अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राच्या अडचणींबाबत चर्चा झाली. जरांगे यांनी याआधी मंत्री शिरसाट यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेसाठी अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याची तक्रार केली होती. या अनुषंगाने ही भेट झाली. दरम्यान, विद्यार्थ्यांना तत्काळ जात वैधता पडताळणी करून जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेली नाहीत. अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जात आहे. याबाबत मंत्री शिरसाट यांना या अडचणी दूर करण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षण संदर्भातही चर्चा झाली. आम्ही राज्यातील प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना अंतरवाली सराटी येथे बोलवणार आहोत. आरक्षणाचा विषय येणाऱ्या ३० जूनच्या अधिवेशनात मार्गी काढा, अशी आमची मागणी आहे.
त्यानंतर २९ ऑगस्टला मुंबईला जाऊन धडकणार, त्यानंतर मागे फिरणार नाही. परिणाम काय होईल, आम्हाला माहीत नाही. काल सत्ताधारी अन् विरोधकांचे दहा ते पंधरा आमदार येऊन गेले. आम्ही त्यांना सांगिते. २९ जूनला अंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक आहे. त्यात सांगणार की, आम्ही एवढ्या आमदार, खासदार मंत्री यांना फोन केले, त्यातील एवढे आलेत. त्यानंतर समाज बघेल, काय करायचं ते, असा इशारा जरांगे यांनी दिला.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अडचण येत असल्यामुळे मनोज जरांगे यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आपण जरांगे यांच्या भेटीसाठी आल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, जात पडताळणी प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध व्हावेत. यासाठी आपण प्रधान सचिवांना तातडीने आदेश निर्गमित करण्याची सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, जात पडताळणी प्रमाणपत्राच्या अडचणींबाबत भेट झाली असल्याचे सांगण्यात येत असले. तरी मागील काळात अनेक आरोपानंतर मंत्री शिरसाट यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने त्यामागे अनेक अर्थ निघत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.