

Sand mafia reined in at the Dudhna riverbed in Kalegaon
जालना, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यालतील दुधना काळेगाव येथील दुधना नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने रविवार (दि. १४) रोजी सकाळी ऐन प्रहरात छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका जेसीबीसह दोन हायवा गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
दरम्यान, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक अंकुर धांडगे हे सहकाऱ्यांसह जालना शहरात शासकीय वाहनाने गस्तीवर होते. याच दरम्यान दुधना काळेगाव येथील दुधना नदीपात्रात काही वाळूमाफिया जेसीबीच्या साहाय्याने हायवा ट्रकमध्ये बेकायदेशीर वाळू भरत असल्याची पक्की माहिती गुप्त बातमीदाराने दिली.
माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. खामगळ, पोहेका. भोजणे, पोका. करतारे आणि चापोहेकाँ पवार यांच्या पथकाने दोन पंचांसह सकाळी ८:३० च्या सुमारास नदीपात्रात अचानक छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन आरोपींना अटक केली आहे.
यात अनुज दिलीप कावळे (२०, जेसीबी चालक), अभिषेक चत्रभुज कावळे (वय १९, हायवा चालक) दोघे रा. गणेशनगर गोलापांगरी, ता. जि. जालना तर अमोल शिवनाथ जिगे (३३, रा. मठपिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना हायवा मालक व चालक) आदींचा समावेश आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेसीबी (क्र. एमएच १७, सीएम ८८२६): पिवळ्या रंगाचा रिकामा जेसीबी (किंमत अंदाजे १० लाख रुपये), हायवा ट्रक (क्र. एम एच ०४, एचवाय ६६२०), पांढऱ्या रंगाचा आणि आकाशी रंगाची ट्रॉली असलेला रिकामा हायवा (किंमत अंदाजे २० लाख रुपये), हायवा ट्रक (क्र. एमएच २०, इएल ७२७७): पांढऱ्या रंगाचा आणि आकाशी ट्रॉली असलेला ट्रक, ज्यात ४ ब्रास अवैध वाळू भरलेली होती (किंमत अंदाजे २० लाख २० हजार रुपये). असा एकूण ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाळूची विनापरवाना चोरटी वाहतूक आणि शासनाची महसूल बुडवून चोरी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी पोलिस नाईक अंकुर धांडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या सूचनेनुसार पुढील तपास
महसूल आणि पोलिस प्रशासन अलर्ट
जिल्हाभरात अवैध वाळू उत्खनन होत असल्यापचे अनेक प्रकार पुढे आले आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. यासाठी जिल्हा धिकारी आशिमा मित्तल आणि पोलिस अधीक्षक तेघबिर सिंग संधू यांनी वाळूमाफियांविरोधात संयुक्तपणे मोहीम उघडली आहे. जिल्हाअधिकारी यांनी स्वतः वाळूघाटावर जाऊन पाहणी केली. त्यामुळे महसूल आणि पोलिस प्रशासन आता अलर्ट झाले आहे. रविवारी एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
गाड्यांच्या नंबर प्लेटवर खाडाखोड: रॉयल्टीचा पत्ताच नाही !
पोलिसांनी नदीपात्रात छापा टाकला तेव्हा तेथे एक पिवळा जेसीबी आणि दोन हायवा ट्रक वाळू भरताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ जेसीबी बंद पाडून चालकांकडे वाळू उपसा आणि वाहतुकीच्या रॉयल्टी परवान्याबाबत चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे कोणताही परवाना मिळून आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, कारवाई टाळण्यासाठी वाळू माफियांनी हायवा आणि जेसीबीच्या नंबर प्लेटवर अक्षरशः खाडाखोड केली होती.