Jalna illegal sand mining : अवैध वाळूसह 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

दुधना नदीतून वाळूचा उपसा; जालना-गोलापांगरी मार्गावर एलसीबीचा छापा
Jalna illegal sand mining
अवैध वाळूसह 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्तpudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना-गोलापांगरी रोडवरील अंतरवाली गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी कारवाई केली आहे. दुधना नदीपात्रातून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या वाळूची चोरी करून वाहतूक करणारा एक हायवा ट्रक पोलिसांनी जप्त केला असून, चालकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 20 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोमवार, दि. 1 रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ हे सहकाऱ्यांसह (पोहेकॉ भोजणे, पोहेकॉ खाडे, पोहेकॉ जैवाळ आणि चापोहेकॉ पवार) शासकीय वाहनाने जालना शहरात जिल्हा गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. गस्तीदरम्यान पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली की, गोलापांगरी बाजूकडून जालन्याकडे एक हायवा टिप्पर चोरटी वाळू विक्रीसाठी घेऊन येत आहे.

Jalna illegal sand mining
Sand Smuggling : वाळू तस्करांना दणका! जळगाव जिल्ह्यात पाच ठिकाणी पोलिसांचे छापे; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने जालना रोडवरील अंतरवाला गावाजवळ सापळा रचला. काही वेळातच पोलिसांना विना नंबरचा एक संशयास्पद हायवा ट्रक जालन्याकडे येताना दिसला. पोलिसांनी हात दाखवून वाहन थांबवले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अल्लानवाज मनसब पठाण (34 वर्षे, रा. पिरपिंपळगाव, ता. जि. जालना) असे सांगितले.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, हायवा ट्रकच्या नंबर प्लेटवर खाडाखोड केलेली आढळून आली, मात्र कागदपत्रांवर त्याचा क्रमांक एमएच17, सीव्ही 2123 असा होता. हायवामध्ये भरलेल्या वाळूबाबत रॉयल्टी किंवा वाहतूक परवान्याची विचारणा केली असता, चालकाकडे कोणताही परवाना नव्हता. अधिक चौकशीत त्याने ही वाळू बठाण बुद्रुक येथील दुधना नदीपात्रातून चोरून आणल्याची कबुली दिली. तो स्वतःच या गाडीचा चालक आणि मालक असल्याचे समोर आले आहे.

Jalna illegal sand mining
illegal sand mining nanded | डीवायएसपी पानेगावकरांचा पहाटेचा दणका; अंतरगावच्या अवैध वाळू साम्राज्यावर धाड

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सचिन विठ्ठलराव खामगळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अल्लानवाज मनसब पठाण याच्याविरुद्ध नवीन कायद्यानुसार, भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये तालुका पोलिस ठाणे, जालना येथे गुन्हा क्रमांक 0323 नोंदवण्यात आला आहे.

पाच ब्रास वाळू जप्त

पोलिसांनी दोन पंचांसमक्ष कारवाई करत टाटा कंपनीचा हायवा टिप्पर (एमएच17, सीव्ही 2123) किंमत अंदाजे 20 लाख रुपये.

बेकायदेशीर गौण खनिज (वाळू): 5 ब्रास वाळू, किंमत अंदाजे 25,000 रुपये असा एकूण 20,25 हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बाळासाहेब गाडेकर करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news