

आन्वा : बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या करडई व सूर्यफुलाचे क्षेत्र भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात अक्षरश: शून्य टक्क्यावर येऊन हे तेलवर्गीय पीक हद्दपारच झाल्याचे चित्र दिसून येत असून करडईच्या वाटेवर काटेच काटे असल्याची प्रचिती येत आहे.
आन्वा परिसरात पूर्वी रब्बी हंगामात ज्वारी बरोबर करडईचे पीक घेतले जात असे, तर शेतकरी खरिपासह रब्बीत सूर्यफूल घेत होते. मात्र आता करडई व सूर्यफूल पिके घेण्याकडे सर्वच शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.
आज सर्वत्र करडई व सूर्यफूलपासून उत्पादित तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या करडई व सूर्यफूलास अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ही पिके घेण्याकडे पाठ फिरवून गहू व हरभऱ्यास पसंती दिली आहे.
पूर्वी आहारात करडईचे तेल वापरणे प्रतिष्ठेचे व आरोग्यवर्धक मानले जात असत. परंतु आजकाल करडई दुर्मिळ झाली. त्यातच करडई पीक घेतल्यास ती मनुष्यबळाअभावी काढणीला अवघड ठरत आहे. तसेच यांत्रिक पद्धतीने त्याच्या काढणीवर मर्यादा येऊन मजुरांवर करडई पिकाच्या सोंगणीसाठी अवलंबून राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकांस पसंती दिली.
करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असून हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांना करडई पिकाबाबात मार्गदर्शन केले जात आहे; परंतु याहीवर्षी शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली आहे.
गेल्या विस वर्षापासून करडईची लागवड दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असून त्यात करडईचा निभाव लागेनासा झाला आहे. काळाच्या ओघात शेतकऱ्यांचा कल बदलल्याने करडईचे क्षेत्र घटत गेले आजमितीला करडईच्या क्षेत्राचा विचार करता 1 टक्का देखील क्षेत्र करडईच्या वाट्याला आलेले नाही.
गहू व हरभरा पिकाचा पेरा वाढला
शेतकऱ्यांनी अलीकडील काळात गहू व हरभरा, मका पिकाला अधिक पसंती दिल्याने मागील वीस वर्षांपासून रब्बी हंगामातून तेलवर्गीय असलेल्या करडई व सूर्यफूलाचे पीक जवळपास इतिहास जमा होण्याच्या मार्गावर असून, यंदा यांचे क्षेत्र शून्य टक्क्यावर असल्याचे चित्र पहावयास मिळते.