

Roadblock on Solapur-Dhule highway for Godavari water
शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील शहागड वाळकेश्वर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये तत्काळ पाणी सोडावे, या मागणीसाठी शुक्रवारी (२०) रोजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सोलापुर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील राक्षसभुवन फाटा येथे हजारो शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गोदावरी नदीपात्रातील पाणीसाठा आटल्याने गेवराई व अंबड तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने सुमारे दोन तास करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
गेवराई तालुक्यात वडीगोद्री ते गेवराई दरम्यान सुमारे दोन किलोमीटर, तर शहागड परिसरात तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागझरी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने नागरिकांसह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोदावरी नदीपात्रातील शहागड वाळकेश्वर व इतर कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाणीपातळी घटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गावर उतरून चक्काजाम केला. आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार गीतांजली गरड उशिरा दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली. प्रशासनाच्या विलंबामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, "पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!" अशा घोषणा दिल्या.
यावेळी अंबड तालुका शिवसेना संघटक तथा लोकसभा संघटक राजेश राऊत यांनीही आक्रमक भूमिका घेतली. अंबड तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी पोहोचवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शहागड येथील पैठण फाटा येथे यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलकांनी पाणी सोडण्यासाठी प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. प्रशासन पाणी सोडण्याची कार्यवाही कधी करणार, याकडे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचनाही आमदार कुचे यांनी दिल्या. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सोमेश मोहिते, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.