

Rivers and streams have run dry; farmers' enthusiasm has dampened due to the lack of water
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यात पावसाअभावी सर्जा-राजाची अंघोळ बकेटभर पाण्यात उरकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने घनसावंगी तालुक्यातील नदी-नाले, ओढे, पाझर तलाव आणि छोटे जलसाठे कोरडेठाक असून, दुष्काळाच्या झळा आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या बैलपोळा सणालाही बसल्या आहेत.
पोळा म्हणजे शेतकरी आणि बैलांच्या नात्याचा जिव्हाळ्याचा दिवस. वर्षभर उन्हातान्हात शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी अंघोळ घालून, शिंगांना रंग लावून, अंगावर झूल चढवून आणि गळ्यात घुंगरू बांधून सजविले जाते. त्यांची पूजा करून शेतकरी कृतज्ञता व्यक्त करतो.
मात्र यंदा पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे या परंपरेतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. तालुक्यातील अनेक जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.