

मंठा: येथील श्री रेणुकादेवी संस्थानचे सभागृह अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या सभागृहावर काही व्यक्तींनी अनधिकृतपणे अतिक्रमण करून त्र्यांचे शेड उभारले असल्याने संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवून दोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संस्थानचे विश्वस्त बालासाहेब गंगाधर ठोके यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखीं निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले हे सभागृह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांच्या विश्रांतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, काही व्यक्तींनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सभागृहाच्या खाली तसेच सभागृहाच्या वरच्या भागावर पाच पत्र्यांचे शेड उभारून त्या जागेवर बेकायदेशीर ताबा मिळविला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मंठा येथील श्री रेणुका देवी संस्थान हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावतीसह राज्याच्या विविध भागांतून दररोज तसेच विशेषतः नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी मंठ्यात येतात. या भाविकांच्या विश्रांतीसाठी, बसण्यासाठी आणि पावसापासून संरक्षण मिळावे य उद्देशाने हे सभागृह उभारण्यात आले आहे.
कथित अतिक्रमणामुळे सभागृह उभारण्याचा उद्देश धोक्यात आला असून, येत्या नवरात्रोत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.. भाविकांना बसण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी आणि गर्दीच्या काळात सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून देण्यामध्ये अडथळे निर्माण होणार असल्याची चिंता विश्वस्तांनी व्यक्ता केली आहे.
या संदर्भातील निवेदनाच्या प्रती नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच मंठा पोलीस ठाण्यालाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि भाविकांच्या हितासाठी कोणती कारवाई करते, याकडे मंठा शहरातीला नागरिकांसह भाविकांचे लक्ष लागले आहे.
उपाय योजना करा
संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवून जागा पूर्ववत करावी, अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी तसेच भविष्यात संस्थानच्या मालमत्तेवर पुन्हा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.