Jalna Crime | भोकरदन पोलिसांची मोठी कारवाई; चोरीतील ८.८० लाखांची रोकड मध्य प्रदेशातून जप्त

वाहनाची काच फोडून ९ लाखांची चोरी; आरोपी फरार, घरावर छाप्यात रोख रक्कम हस्तगत
Bhokardan Police Stolen Cash MP Recovery
८ लाख ८० हजारांची रोकड मध्य प्रदेशातून जप्त करण्यात भोकरदन पोलिसांना मोठे यश आले Pudhari
Published on
Updated on

Bhokardan Police Stolen Cash MP Recovery

भोकरदन : भोकरदन शहरातून पिकअप वाहनाची काच फोडून चोरून नेलेल्या ९ लाखांच्या रोख रकमेपैकी ८ लाख ८० हजारांची रोकड मध्य प्रदेशातून जप्त करण्यात भोकरदन पोलिसांना मोठे यश आले आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या घरांवर छापे टाकून ही रोकड जप्त करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

मंगळवारी (दि. २८ ) जप्त करण्यात आलेली रक्कम अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या हस्ते, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भोकरदन पोलीस ठाण्यात कोठा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिलांकडे सुपूर्द करण्यात आली.

Bhokardan Police Stolen Cash MP Recovery
Jalna Crime News : घरासाठी १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ

या प्रकरणातील फिर्यादी बबीता भागाजी इच्छे (वय ४०, रा. कोठा जहागीर) यांनी २३ जुलै रोजी जय योगेश्वर बचत गटाच्या नावाने भारतीय स्टेट बँक, भोकरदन शाखेतून ९ लाखांची रोकड काढली होती. ही रक्कम त्यांनी एमएच-२१-बीई-०५०४ क्रमांकाच्या पिकअप वाहनाच्या केबिनमध्ये ठेवली होती. भोकरदन-जाफ्राबाद मार्गावरील रत्नमाला लॉन्सजवळ वाहन उभे करून त्या चहा पिण्यासाठी गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी वाहनाची डाव्या बाजूची काच फोडून रोकड लंपास केली. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर आणि पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. भारतीय स्टेट बँक परिसरासह आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचे फोटो मिळविण्यात आले. आरोपींची ओळख अथवा गावाची माहिती नसतानाही गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुलखेडी परिसरातील असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले.

त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या परवानगीनंतर विशेष पथक मध्य प्रदेशात रवाना झाले. राहुल उत्तम सिसोदीया (रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड), कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदीया (रा. कडिया (सासी), ता. पचोर, जि. राजगड) आणि कल्लू उर्फ जगप्रकाश सांसी (रा. मुगावली, ता. गुणा, जि. अशोकनगर) या संशयित आरोपींच्या घरांवर छापे टाकण्यात आले. आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांच्या घरातून ₹८.८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

Bhokardan Police Stolen Cash MP Recovery
Jalna Crime | शेताजवळून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून वाद; तरुणाला दगडाने मारहाण

अशी होती चोरीची पद्धत

तपासादरम्यान आरोपींची गुन्हे करण्याची विशिष्ट पद्धतही समोर आली. हे आरोपी प्रथम बँका किंवा सराफा दुकानांमध्ये रेकी करत. एक आरोपी आतमध्ये तर दुसरा बाहेर वाहनासह लक्ष ठेवत असे. संधी मिळताच वाहनांची काच फोडून रोकड चोरून ते कोणत्याही हॉटेल किंवा लॉजमध्ये न थांबता थेट राज्याबाहेर पसार होत. ओळख लपविण्यासाठी हेल्मेटचाही वापर करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत तसेच पोलीस अंमलदार संदीप भुतेकर, संतोष बनकर, किशोर मोरे, उमेश टेकाळे आणि शिवाजी जाधव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Bhokardan Police Stolen Cash MP Recovery
Jalna Crime : बचतगटाच्‍या महिलांचे नऊ लाख रुपये चोरले; गुन्‍हा दाखल

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. शक्यतो ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य द्यावे, बँकेतून पैसे काढल्यानंतर अनावश्यक ठिकाणी थांबू नये, रोख रक्कम उघडपणे दाखवू नये आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने डायल ११२ किंवा भोकरदन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news