

नितीन थोरात
वैजापूर : नांदूर मधमेश्वरअंतर्गत गंगापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर शाखा कालवा क्र. 2 वरील सा. क्र. 0 ते 15000 मी. मधील व 15000 ते 16400 मी. मधील शाखा कालव्याचे व त्यावरील वितरिकेचे तसेच शाखा कालवा क्र. 1 वरील वितरिका क्र.5 चे निवडक अस्तरीकरण व शाखा कालव्याचे सिंचन व्यवस्थापनातील त्रुटींच्या दुरुस्तीचा कार्यारंभ आदेश मे महिन्यात काढण्यात आला होता. हे काम के. के. कंट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे, मात्र या 11 कोटींच्या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
लायनिंग (काँक्रिट) अस्तरीकरण कामात गंभीर चुका व नियमबाह्य प्रकार उघडकीस आला आहे. तर या प्रकरणातील कडा ऑफिसकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता संत यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली असल्याची माहिती आहे.11 कोटी रुपये खर्च करून सुरू असलेल्या या कामात दर्जा, मोजमाप व नियंत्रण यांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी काढण्यात आलेल्या निवेदा या कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या खिशात भरल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.
सदर लायनिंगचे काम काँक्रिट करण्यासाठी नियम असून, या प्रक्रियेत पॉलिथीन पेपरचा वापर अनिवार्य असतो. मात्र प्रत्यक्षात पॉलिथीनचा वापर केवळ औपचारिक ठरल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे लायनिंगसाठी आवश्यक असलेला सेंटीमीटरचा काँक्रिट थर न वापरता निकृष्ट दर्जाचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे इतक्या मोठ्या रकमेच्या कामासाठी घटनास्थळी क्वालिटी कंट्रोल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक असतानाही कोणताही जबाबदार अधिकारी वा नियंत्रण यंत्रणा प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नव्हती. यामुळे ठेकेदाराला मनमानी करण्याची मोकळीक मिळाल्याचा संशय तर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे मिळून मिसळून अभय दिल्याचे बोलले जात आहे.
11 कोटींचा दरोडा ?
लायनिंग कामाच्या नावाखाली थेट लूट आहे. दर्जा, मोजमाप आणि नियंत्रण या तिन्ही गोष्टींची येथे खुलेआम थट्टा सुरू आहे. नियम सांगतात ठराविक सेंटीमीटरचा काँक्रिट थर, पण प्रत्यक्षात मात्र कागदावर काँक्रिट आणि जमिनीवर फसवणूक, पॉलिथीन न अंथरता थातूरमातूर कॉंक्रिट टाकून काम उरकायचे आणि 11 कोटी रुपयांचा हिशेब दाखवायचा ही कसली विकासकामे? हा विकास शेतकऱ्यांचा की ठराविक कंत्राटदारांचा? मराठवाड्यातील या भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी नेहमी वणवण भटकंती करावी लागते आणि इकडे मंजूर झालेल्या पैशाची लूट सुरू आहे. हे लायनिंग उद्या वाहून गेले तर नुकसान कोणाचे? पुन्हा तोच शेतकरी, तेच कोरडे शेत आणि तोच फसवलेला विश्वास. त्यामुळे या कामाची तात्काळ तांत्रिक चौकशी, थर्ड पार्टी ऑडिट करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अधिकाऱ्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट
या सगळ्या प्रकाराविषयी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधींनी कार्यकारी अभियंता संत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्या सहाय्यकाशी संपर्क करा, मी आंदोलनात आहे, असा संदेश पाठवत सल्ला दिला. त्यानंतर प्रतिनिधींनी प्रशासनाची बाजू ठामपणे समजून घेण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या महापुरे नावाच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधला. त्यांनीही आम्ही अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे सांगत.आणखी काही माहिती हवी असेल तर आमचे कर्मचारी प्रवीण सुरासे यांच्याशी संपर्क करा, असे सांगत एकमेकांकडे बोट दाखवत टोलवा टोलवी केली.
चौकशी करून कारवाईकरा
11 कोटींच्या सार्वजनिक निधीतून होणारे काम अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे असल्यास, भविष्यात या वितरिकेचे आयुष्य धोक्यात येणार आहे. यासोबत पाण्याची मोठी नासाडी तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले जाणार हे निश्चित. या प्रकरणात जबाबदार अधिकारी, अभियंते व संबंधित ठेकेदारांवर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. अन्यथा हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशाची उघड लूट असल्याचा संताप लाभधारक शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.