Jalna News : मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे रास्ता रोको
Rasta roko at Machindranath Chincholi
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील अंबड-कुंभार पिपळगाव रस्त्यावर ग्रामस्थांनी बुधवार (१८) रोजी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले.
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे २ कोटी रुपयाच्या जलजीवन मिशन कामाची मागणी करूनही ती मंजूर करण्यात आली नाही, शासनाच्या वतीने गावकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मूलभूत गरजा मिळत नसल्याने मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे शासनाच्या विरोधात नागरी समस्यासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी आक्रोश लेकी बाळींचा, चक्काजाम आंदोलन बुधवार (१८) रोजी करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार सोमनाथ तोतला यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील देवस्थानाला अ दर्जा देऊन तीर्थक्षेत्र घोषित करावे, २ कोटी जल जिवन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे अर्धवट काम पूर्ण करावे, गावातील अवैध धंदे बंद करावे, नाल्या अंडरग्राउंड व्हाव्यात, प्रमुख रस्ते तातडीने दुरुस्त करावे, जि.प. शाळेची ईमारत दुरुस्त करावी, विजेचे लोड शेडिंग कायमचे बंद करावे आदी मागणीचे निवेदन गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
सुमारे दोन तास करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात रामभाऊ घोगरे, सुंदर मुळक, बळीराम मोरे, परमेश्वर घोगरे यांच्यासह महिला, मुले, वृद्ध, शालेय विद्यार्थी गावकरी सहभागी झाले होते. यावेळी सरकार योजनांची घोषणा करतं पण त्याचं प्रत्यक्षात काहीच होत नाही.
आमचं आयुष्य तहानलेलं आहे, असे सागून महिलांनी शासनाला धारेवर धरले. आंदोलनात युवकांनी हातात फलक घेऊन घो-षणांनी परिसर दणाणून सोडला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षणाऐवजी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली.
प्रशासनाचे आश्वासन
नायब तहसीलदार सोमनाथ तोतला यांनी आठ दिवसांत पुढील उपाययोजना केल्या जातील, व जलजीवन मिशनअंतर्गत कामे वेगात पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आंदोलकांना दिले. त्यांनतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

