

Raid on Sairaj Lodging; case registered against three, including the owner
जालना, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील कडेगाव शिवारात असलेल्या 'हॉटेल साईराज लॉजिंग'वर बदनापूर पोलिसांनी छापा टाकून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत नाशिक येथील एका ३० वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली असून, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालवणारा लॉज मालक, मॅनेजर व गिऱ्हाईक अशा तिघांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना कडेगाव शिवारातील 'हॉटेल साईराज लॉजिंग'मध्ये बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत पोलीस पथक तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक कुकलारे, पोलीस हवालदार नागलोत, गोपनीय शाखेचे अंमलदार शाबान तडवी, चालक राठोड आणि महिला पोलीस अंमलदार पवार यांच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:५० च्या सुमारास हॉटेल साईराजवर अचानक धाड टाकली.
पोलिसांचे पथक लॉजवर पोहोचले असता काऊंटरवर लॉजचा मॅनेजर अर्जुन उर्फ शिवा गौरीलाल जोशी (वय २५, रा. देवगाव, ता. बदनापूर) हा आढळून आला. पोलिसांनी लॉजच्या पहिल्या मजल्यावरील खोल्यांची झडती घेतली असता, रुम नंबर १०१ मध्ये एक महिला आणि पुरुष संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांची चाहुल लागताच गिऱ्हाईक सूरज भानुदास धबडकर (रा. नूतन वसाहत, जालना) याने तेथून पळ काढला. तर दुसरीकडे पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी मॅनेजर अर्जुन जोशी यानेही हॉटेलवरून खाली उडी मारून अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली.
लॉजमध्ये सापडलेल्या महिलेची (वय ३०, रा. पवन नगर, नाशिक) चौकशी केली असता, लॉज मालक ओवेस सलीम कुडचीवाला (वय ४४, रा. शिरीन विला, दिल्ली गेटजवळ, छत्रपती संभाजीनगर) आणि मॅनेजर अर्जुन जोशी यांनी आर्थिक फायद्यासाठी १,००० रुपयांच्या मोबदल्यात देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे उघड झाले. महिला पोलिसांमार्फत केलेल्या झडतीमध्ये महिलेकडून १,००० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच खोलीतून व लॉजमधून सीलबंद निरोधसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पीटा ॲक्टखाली नोंद
याप्रकरणी गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार शाबान जलाल तडवी यांच्या फिर्यादीवरून लॉज मालक ओवेस सलीम कुडचीवाला, चालक/मॅनेजर अर्जुन ऊर्फ शिवा जोशी आणि गिऱ्हाईक सूरज धबडकर या तिघांविरुद्ध 'स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम' (PITA Act) १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे महामार्गावरील अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुकलारे करत आहेत.