

Property worth Rs 2.5 lakh stolen from a locked house in Mahora
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील माहोरा येथील गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठी घरफोडी केली आहे. ही घटना रविवारी (दि.३०) रात्री सव्वा एकच्या सुमारास घडली असून गावातील रहिवासी पुख-राज डिगंबर गव्हले यांच्या घरात पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी घुसून तब्बल २ लाख ४९ हजार किमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
गावातील पुखराज गव्हले हे घरी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी अंधाराचा आणि घरातील शांततेचा फायदा घेतला. शेजारील घरांच्या बाहेरील कड्या लावून घेतल्यानंतर, चोरट्यांनी गव्हले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी लोखंडी पेटी फोडून २ लाख ४९ हजारा चे दागिने आणि नगदी पैसे लंपास केले.
या घटनेदरम्यान शेजारी राहत असलेले घनश्याम वाघ यांना रात्री संशयास्पद आवाज ऐकू आल्याने ते जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता काळ्या कपड्यांतील व चेहऱ्यावर रुमाल बांधलेले सहा चोरटे गव्हले यांच्या घरातून बाहेर पडताना दिसले. त्यांनी तत्काळ पुखराज गव्हले यांना फोन करून माहिती दिली. सरपंच गजानन लहाने यांनी पोलीस ठाण्याला तात्काळ माहिती दिली.
माहिती मिळताच उपोनि वासुदेव पवार व चालक डोईफोडे रात्रीच घटनास्थळी पोहोचले. सकाळी सपोनि वैशाली पवार, कॉन्स्टेबल अरुण वाघ, विजय जाधव, जालना येथून आलेले डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट पथक यांनी घटनास्थळी तपास सुरू केला. या वेळी स्वान पथकातील हेड कॉन्स्टेबल गणेश मिसाळ, कॉन्स्टेबल सचिन पल्लेवाड, तसेच लुशी डॉग आणि अंगठा मुद्रा (फिंगरप्रिंट) तज्ज्ञांनी संपूर्ण पंचनामा करून तपासाची दिशा ठरवली.
या घटनेमुळे माहोरा गावात घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडे लवकरात लवकर चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी केली आहे.