

Principal fell asleep in class while drunk; bottle in pocket
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वर्गातच दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत झोपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली असून संबंधित मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.
टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दामू भीमराव रोजेकर हे शुक्रवारी दुपारी १ वाजता इयत्ता दुसरीच्या वर्गात दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत झोपलेले आढळले. माजी सरपंच बळीराम गावंडे यांनी शुक्रवारी शाळेला भेट दिली.
त्यांनी वर्गात जाऊन पाहिले असता, मुख्याध्यापक रोजेकर नशा करून झोपलेले दिसले. हा प्रकार माजी सरपंच गावंडे यांनी तत्काळ गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून सांगितला. त्यानंतर गट समन्वयक एस. बी. नेव्हार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी मुख्याध्यापक रोजेकर यांच्या खिशात देशी दारूची भरलेली बाटली सापडली.
गट समन्वयक नेव्हार म्हणाले की, संबंधित प्रकरणाचा अहवाल गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणार असून, पुढील कार्यवाही लवकरच होईल. मुख्याध्यापक रोजेकर यांचा असा गैरप्रकार हा नवीन नाही, ते याआधीही अशाच अवस्थेत आढळून आल्याचे पालकांनी सांगितले.