

Jalna city Ganeshotsav idol maker financial crisis
जालना, पुढारी वृत्तसेवा श्री गणेशाचे आगमन अवधे महिन्यावर आले असल्याने जालन्यात गणेशमुर्ती आकारास येत असून यंदा विघ्नहर्ता आर्थिक संकट दूर करण्याची आशा मूर्तिकारांना आहे. जालना शहर व जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात, उत्साहात साजरा करण्यात येतो. एक महिन्यावर आलेल्या श्री च्या आगमनामुळे शहर व परिसरात मुर्तिकामाची लगबग वेगात सुरु आहे. सुबक गणेशमूर्ती आकार घेत आहेत. हा व्यवसाय आर्थिक संकटात असला तरी पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या मुर्तिकारांचे आर्थिक संकट विघ्नहर्ता दूर करेल, या आशेवर मुर्तिकारांनी मूर्तिकामाचा श्रीगणेशा केला आहे.
सुबक व रेखीव शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच पीओपीच्या मूर्तीना मोठी मागणी असते. उत्सवाला सुमारे एक महिना बाकी असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात गणेशमूर्ती मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भागात प्रसिद्ध कलाकारांकडे मोठ्या संख्येने गणेशमूर्ती तयार होतात. दरवर्षी गणेशमूर्तीच्या साहित्यात वाढ होत असते. यंदाही शाडू माती, कलर, प्लास्टर व इतर साहित्याच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईचे संकट तोंडावरच आहे. महागाई वाढली असली तरी शहरात पिढ्यानपिढ्या अनेक जण मूर्ती बनविण्याच्या व्यवसायात आहेत.
महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची बाप्पाच्या विविध आकाराच्या रेखीव आणि सुबक मूर्ती तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील सर्वच मूर्तिकारांकडून श्री गणेश मूर्ती बनविण्योच काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा गणपतीच्या राममंदिर, द्वारकाधीश, लालबाग आणि दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्याचप्रमाणे, घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या कृष्णरुप आणि बालगणेश या मूर्तीदेखील बनविल्या जात आहेत.