

Prices of dried fruits have risen.
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : थंडीची चाहुल लागताच परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात सकामेवा खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सुकामेव्याची मागणी वाढल्याने खोबऱ्याचे भाव चारशे पार गेले आहेत. बदाम ८००, गोडंबी १४०० रुपये किलो या दराने विक्री होतांना दिसत आहे.
भोकरदन तालुक्यात गेल्या काही दिवसापासुन थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरीकांनी सुकामेवा खरेदीस सुरुवात केली आहे. वाढत्या मागणीमुळे सुकामेव्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांना आखडता हात घेत सुका मेव्याची खरेदी करावी लागत आहे. आठवडी बाजारात नागरिक खोबरा, बदाम, काजू आदी सुकामेव्याची दुकाने थाटत आहेत.
थंडी वाढल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ होत आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन तिस्कळीत झाले होते. मात्र, हवामानात गारवा वाढताच पुन्हा ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ दिसून येत आहे. दरम्यान थंडीच्या दिवसांत सूकामेव्याला नेहमीच मागणी वाढते.
यंदा दरवाढ जास्त वाटत असल्याने ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करतांना दिसत आहेत. भारत-पाकिस्तान अफगाणिस्तानातील सुकामेव्याच्या तणावामुळे आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी दिवाळी आणि थंडीच्या दिवसात सुकामेव्याच्या मागणीत वाढ होते. आठवड्यात थंडी वाढल्यावर खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुकामेव्याचे भाव मागील वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गोरगरीबांना पौष्टिक लाडू बनवताना खिशाला महागाईची चांगलीच कात्री बसणार आहे.
दुकानात गर्दी नाही
दर वाढीमुळे अनेक ग्राहक आवश्यक तेवढाच सुकामेवा खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याने दुकानात अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. मात्र, पुढील आठवड्यात खरेदी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खोबरा - ४०० खारीक २००, बदाम ८००, काजू ९००, मेथी - ७० ते ८०, गोंडबी १४००, किलो या भावाने विक्री होत आहे.