

Shiv Sena Shinde group's gathering; Ladki Bahin scheme will not be closed Eknath Shinde
जालना, पुढारी वृत्तसेवा राज्यातील महायुती सरकारने शेतकरी, लाडक्या बहिणी, लाडके भावासह सर्वांसाठी योजना सुरू करून मदतीचा हात दिला. कष्टकरी व सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या या सरकारला काही जण दगाबाज म्हणतात. महायुतीला दगाबाज म्हणणाऱ्यांनी स्वतः सत्तेत असताना काय केले याचे आत्मपरिक्षण करावे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली.
जालना शहरातील महावीर चौकात आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. अर्जुनराव खोतकर, आ.डॉ. हिकमत उढाण, उबाठा शिवसेनेतून प्रवेश केलेले जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, अनिरुध्द खोतकर, अभिमन्यू खोतकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, सत्ता येते अन् जाते. मात्र नाव गेले की परत येत नाही. आम्ही हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपणारे व पुढे नेणारे आहोत. माझी लाडक्या बहिणीचा भाऊ ही ओळख माझ्यासाठी महत्वाची आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना आम्ही ३२ हजार कोटींचे पंकज दिले. काही जण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमच्यावर टीका करताना माझ्या हातात काही नाही असे कारण पुढे करीत आहेत. ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी मदत का केली नाही असा टोला शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आपण मुख्यमंत्री असताना ७० हजार रुग्णांना उपचारासाठी ४५० कोटी रुपये दिले. लाडकी बहीण योजना सुरू करून लाडक्या बहिर्षीना दीड हजार रुपये दिले. हे सरकार डबल इंजिन सरकार आहे. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी चुनावी जुमला असल्याची टीका केली. लाडक्या बहिणींनी शिवसेना शिंदे पक्षाचे ८० पैकी ६० उमेदवार निवडून दिले. तर टीका करणाऱ्यांचे केवळ २० उमेदवार निवडून आले. काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.
शिवसेना शिंदे पक्ष पुढे जात असल्याचे पाहून काही जणांना पोटदुखी होत आहे. त्यांना जमाल गोटा देण्याचे काम करावे लागणार आहे. माझ्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने काहींना मळमळ तर काही जणांना जळजळ झाली. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपयांची किंमत कळणार नाही असा टोलाही शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
आगामी काळात जालन्याचा चेहरा-मोहरा बदलविणार : आ. खोतकर
जालना शहरातील घरकुल, झोपडपट्टीधारकांच्या पीआर कार्डचा प्रश्न, शहरातील फिल्टस्बेडसाठी निधीसह सर्वच प्रश्न उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांनी सोडविले. आगामी काळात शहरातील नागरीकांचा पाष्णी प्रश्न सोडवून शहराचा चेहरा मोहरा बदलणार असे प्रतिपादन आ. अर्जुनराव खोतकर यांनी केले. जालना शहरातील महावीर चौकात आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, भास्कर आंबेकर व मी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी मनाने एक होतो. आज त्यांच्या शिवसेना शिंदे पक्षातील प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढवण्यास मदत होणार आहे. जालना शहरातील महात्मा फुले मार्केट बांधण्यासह जालना-नांदेड महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच सुटणार आहे. जालना शहरात लवकरच नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे खोतकर यांनी सांगितले.