

Power supply to agricultural pumps cut off, farmers protest
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना तालुक्यातील दरेगाव, सिरसवाडी, देवपिंपळगाव येथील कृषी पंपाचा वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.०३) युवा सेना तालुका सरचिटणीस रवींद्र ढगे यांच्या नेतृत्व-ाखाली मस्तगड परिसरातील महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून महावितरणने देवपिंपळगावसाठी वेगळी वीज वाहिनी जोडणीच्या कामास सुरुवात केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशा स्थितीत दिवसा आणि रात्रीही वीजेचा लपंडाव सुरू असून गत आठवड्यापासून शेतीपंप बंद आहेत. कारभारास महावितरणच्या वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता कार्यालयात धडक दिली. देवपिंपळगाव साठी वेगळी वीज वाहिनी जोडल्यास सिरसवाडी आणि दरेगाव येथील भार कमी होईल, असे रवींद्र ढगे यांनी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी तत्काळ कामाला सुरुवात केली.
ग्रामस्थांची उपस्थिती
यावेळी अभियंता खिल्लारे, पंडित, वानखेडे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन चौधरी, नानासाहेब नन्नवरे, रवींद्र ढगे, माजी सरपंच एकनाथ ढवळे, नानासाहेब ढगे, कैलास खळेकर, अली चाऊस, कैलास काजळकर, उपसरपंच श्रीहरी ढगे, विलास ठोंबरे, प्रदीप वाहुळकर, रामनाथ काजळकर, नंदकिशोर वाघमारे, योगेश ढगे, परमेश्वर ठोंबरे, नंदू ढगे, रामभाऊ ढगे, प्रल्हाद ढगे, बळीराम ढगे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.