

Potholes on Dhule-Solapur Highway despite toll collection of lakhs of rupees
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : धुळे-सोलापूर महामार्गावरील शहागड, वडीगोद्री, समर्थ कारखाना, गहिनीनाथ नगर, माळेवाडी, लेंभेवाडी, मुरमा या भागात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. टोलसाठी पैसे मोजूनही वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्त होत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. यामुळे टोलवसुली जोमात मात्र रस्ता कोमात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावरील शहागड अंबड तालुक्यातील वडिगोद्री, समर्थ कारखाना, गहिनाथनगर, डोणगाव माळेवाडी, लेंभेवाडी, मुरमा या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.. टोल वसुली करणारे कंत्राटदार खड्ड्यांची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांना पैसे मोजूनही खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. वडिगोद्री येथील - दुभाजका जवळील उड्डाणपुलावर - तसेच बाजुच्या रस्त्यासह मांगणी - नाल्यांच्या पुलांवर सतत खड्डे पडत - असतानाच आता मुख्य रस्त्यावरही - खड्डे पडले आहेत. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्याला थातूरमातूर बुजवून वेळ मारून नेताना दिसत आहे. हे खड्डे पुन्हा काही दिवसांत जशास तसे होत आहेत.
महामार्गावरील पुलावर तसेच पुलाखाली घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. तसेच पथदिवे देखील बंद असून अंधारात पाऊस पडल्यानंतर खड्डयात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होतात. या रस्त्यावरील दुभाजकदेखील तुटलेले आहेत. महामार्गावरील खड्डे लवकर बुजवण्यात यावे त्याचबरोबर महामार्गावर बसविण्यात आलेले पथदिवे देखील तत्काळ सुरू करावे, अशी मागणी ही वाहनधारकांडून होत आहे.