

Possibility of a rise in wheat prices.
जालना, पुढारी वृत्तसेवा :
जालना जिल्ह्यात आगामी काही दिवसांत गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी साठवणुकीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जालना मोंढ्यात गव्हाचे दर साधारण २,२०० रुपयांच्या आसपास होते. मात्र नवीन गहू बाजारात येऊ लागल्यानंतर दरात काहीशी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. यंदा बदलत्या हवामानाचा गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला.
थंडीचा कडाका कमी राहिल्याने दाण्यांची गुणवत्ता आणि वजन कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अपेक्षित उत्पादन झाले नाही आणि बाजारात आवकही मर्यादित राहिली. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या गव्हाची गुणवत्ता तुलनेने चांगली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक भागांत एकरी उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा कमी आहे, तर दुसरीकडे सण-उत्सव आणि लग्नसराईमुळे मागणी सातत्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्याचाही स्थानिक दरांवर प्रभाव पडत आहे.
गव्हासोबतच तूर आणि हरभरा या डाळवर्गीय पिकांच्या दरातही सुधारणा दिसून येत आहे. तुरीचा दर सध्या हमीभावापेक्षा सुमारे २०० रुपयांनी अधिक आहे. हरभऱ्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू असतानाच खुल्या बाजारातही चांगला उठाव आहे. उत्पादनातील घट आणि सणासुदीतील वाढती मागणी यामुळे दराला आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. यंदा हंगामात गहूसह प्रमुख पिकांच्या दरात अंशतः सुधारणा झाली असली, तरी बाज-ारातील मर्यादित आवक, हवामानाचा परिणाम आणि जागतिक घडामोडी यामुळे पुढील काळात दराचा कल कसा राहील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सोयाबीनच्या दरातही वाढ
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीही काहीसा दिलासा मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ४,४०० ते ४,५०० रुपयांवर स्थिरावलेले दर आता ४,८०० ते ५,३०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कातील बदल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींमुळे ही वाढ झाली आहे.