

Police training centre trainee dies by drowning
अंबड, पुढारी वृत्तसेवा अंबड शहरालगत असलेल्या खासगी पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय मुलीचा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सरकारी जागेतील खदानीत पोहण्याच्या सरावा दरम्यान पाण्यात बुडून गुरुवारी (दि. ४) मृत्यू झाला.
मत्सोदरी अकॅडमी या खाजगी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी प्रिती अंशीराम भाकड ( रा. दहेगाव खुर्द, ता. अंबड) ही गुरुवारी पोहण्याचा सराव करण्यासाठी खदानीच्या पाण्यात गेली होती. यावेळी तिचा बुडून मृत्यु झाला. दरम्यान प्रशिक्षण संस्थेच्या चालकांच्या व प्रशिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत पालकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या एका वर्षापासून पोलिस भरतीची तयारी करत होती. सकाळी सदर खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना ग्राउंड सरावासाठी शहराजवळील अंबड भालगाव वरून डोंगर पार करून पलीकडे असलेल्या सरकारी खदानीवर नेले होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने प्रीती पाण्यात बुडू लागली. तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी तिला पाण्यातून बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालयात आणण्यापू-र्वीच तिची प्राणज्योत मालवली.
तिला तातडीने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरे एस. एल. यांनी तिची तपासणी करून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला प्रितीच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. मृत युवतीला नातेवाईकांनी थेट पोलिस ठाण्यात आणले. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी होती. अखेरीस पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्रशिक्षक गोकुळ बारवाल, गणेश भागवत यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.