

लातूर : एका क्षणात श्रीमंत होण्याच्या हव्यासाने एका व्यक्तीने रचलेला कट केवळ वाचूनही अंगावर काटा आणणारा आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एका व्यक्तीने चक्क १ कोटी रुपयांचा विमा हडपण्याची योजना आखली. यासाठी त्याने दुसऱ्या एका निरपराध व्यक्तीचा अत्यंत निर्घृण खून करून, तो अपघात नसून स्वतःचा मृत्यू असल्याचे भासवण्याचा भयानक बनाव रचला. लातूर जिल्ह्याला हादरवून सोडणारी ही धक्कादायक घटना अवघ्या २४ तासांत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा पोलिसांना यश आले आहे.
सोमवारी (दि. १५) याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, १४ डिसेंबरच्या मध्यरात्री (रात्री १२.३० वाजता) ११२ हेल्पलाईनवर वानवडा पाटी ते वानवडा रस्त्यावर एका कारला आग लागल्याची माहिती मिळाली. औसा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांना कारमध्ये एका पुरुषाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचा संशय होता. मात्र, घटनास्थळी आढळून आलेले काही पुरावे- जसे की सोनेरी कडे, चिकनची पिशवी आणि दारूची बाटली- यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी तातडीने अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
तपासात जळालेली कार (क्र. एमएच ४३ एबी ४२००) औसा तांडा येथील बळीराम राठोड यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, हे वाहन त्यांचा मेहुणा गणेश गोपिनाथ चव्हाण (रा. औसा) वापरत असल्याचे समोर आले. गणेश १३ डिसेंबरपासून बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईलही बंद होता. कुटुंबीयांनी घटनास्थळी सापडलेले कडे हे गणेशचेच असल्याची ओळख पटवली. त्यामुळे प्राथमिक अंदाज हा मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा होता.
पण, पोलिसांनी केवळ 'अंदाजावर' विसंबून न राहता, तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू ठेवला. गणेशने एका महिलेसोबत केलेले चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आणि येथूनच या गुन्ह्याचा खरा गुंता सुटायला सुरुवात झाली.
त्या महिलेकडून मिळालेल्या दुसऱ्या मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी गणेश चव्हाणचे लोकेशन ट्रेस केले. त्याचे पहिले लोकेशन कोल्हापूर आणि नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे आढळले. पोलीस पथकाने तातडीने विजयदुर्ग गाठून गणेश चव्हाण याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच गणेश चव्हाण याने संपूर्ण कट कबूल केला. त्याने गोविंद किशन यादव (वय ५०, रा. औसा) यांचा खून करून, तो स्वतःचा मृत्यू असल्याचे दाखवून १ कोटी रुपयांचा विमा मिळवण्याचा बनाव रचल्याची कबुली दिली.
आरोपी गणेश चव्हाण याने गोविंद किशन यादव यांना 'लिफ्ट' देण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये घेतले. वानवडा रोडवर नेऊन, दोघांनी सोबत जेवण केले. जेवणानंतर गोविंद यादव झोपी गेले. याच संधीचा फायदा घेत गणेशने गोविंद यादव यांना चालकाच्या सीटवर बसवले आणि सीट बेल्ट लावला. त्यानंतर कारला आग लावून दिली. या भयानक घटनेत गोविंद यादव जळून खाक झाले. या गुन्ह्यात गणेश चव्हाण हाच मुख्य आरोपी असून, त्याने केवळ पैशाच्या हव्यासापोटी एका निरपराध व्यक्तीचा जीव घेतला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सपोनि सदानंद भुजबळ, औसा पोलीस स्टेशनचे पो. नि. रेवणनाथ डमाळे, पोउपनि अतुल डाके, भाऊसाहेब माळवदकर आणि त्यांच्या पथकांनी अवघ्या २४ तासांत अत्यंत गुंतागुंतीच्या या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला पकडले.