

Police take action against a habitual female offender involved in the production and sale of illicit country-made liquor
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्या सराईत महिला गुन्हेगारावर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. कैकाडी मोहल्ला भागात राहणाऱ्या एका महिलेला एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर येथील हर्मूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. बी. शेवाळे यांनी लक्ष्मीबाई हिच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती तसेच इतर समाजविघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमातील कलम 3(1) अन्वये प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अश्मिता मित्तल यांनी 27 जानेवारी २०२६ रोजी लक्ष्मीबाई हिला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशानंतर ती फरार असल्याने पोलीस तिचा शोध घेत होते.
पुढील कारवाई करून तिला हर्सल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलिसांनी केली.
सापळा लावला
२० ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास सदर महिला कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस निरीक्षक जे. बी. शेवाळे यांना मिळाली. त्यानंतर कदीम जालना पोलिसांनी मोतीबाग परिसरात सापळा रचून घरी जात असलेल्या लक्ष्मीबाई हिला ताब्यात घेतले.