

Police rescue six animals brought for slaughter; case registered
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील चमडा बाजार भागात कत्तल करण्यासाठी आणलेल्या सहा गोवंशीय प्राण्यांची सदर बाजार पोलिसा सुटका केली असून या प्रकरणी एका जणाविरुध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सचिन सानप यांच्यासह जमादार डिघोळे, डोईफोडे, तडवी, कानडजे, पोलिस कर्मचारी जायभाये यांना खबऱ्याने माहीती दिली की, चमडा बाजार येथे संशयीत ईरफान अब्दुल रहीम कुरेशी याने कत्तल करण्यासाठी त्याच्या दोन गोडाऊनमध्ये गोवंशीय जातीचे जनावरे ठेवलेले आहेत.
माहीती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन चमडा बाजार येथे ईरफान अब्दुल रहीम करेशी यांच्या गोडाऊनवर गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांनी संशयित ईरफान अब्दुल रहीम कुरेशी याच्या दोन गोडाऊनमधे कत्तल करण्यासाठी आणलेले १ लाख १६ हजार रुपये किमतीचे सहा गोवंशीय जनावरे व कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. पकडण्यात आलेले जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गोशाळेत जमा करण्यात आले.
गोमांस जप्त
जालना शहरातील मंगळ बाजार भागात सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सचिन सानप यांनी बुधवारी दुपारी मंगळ बाजारात भागात ३०० किलो गोमांस जप्त केले होते. या कारवाईत पोलिसांनी ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फेरोज कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या लागोपाठ करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईमुळे गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.