

Police raid gambling den; goods worth ₹1.5 lakh seized
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, भोकरदन पोलिसांनी शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ इसमांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी नगदी रकमेसह ६ मोटारसायकली असा एकूण १,६४,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार, दिनांक २० जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
शोहेब फर्निचरच्या पाठीमागे सुरू होता जुगार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण बिडवे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भोकरदन ते सिल्लोड रोडवरील 'शोहेब फर्निचर' दुकानाच्या पाठीमागे असलेल्या सहान जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकानेत्या ठिकाणी छापा मारून ७ जणांना जागीच ताब्यात घेतले.
या छाप्यात पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून रोख रक्कम आणि विविध कंपन्यांच्या ६ मोटारसायकली असा एकूण १ लाख ६४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार किशोर बाजीराव मोरे यांच्या तक्रारीवरून २० जून रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे भोकरदन येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ नामदेव गायकवाड (रा. पोस्ट ऑफिस जवळ), सतिष लक्ष्मण गाडेकर (रा. पेशवे नगर), राहुल गजानन इंगळे (रा. म्हाडा कॉलनी, भोकरदन), नाजेर खान ताहेर खान (रा. मुल्ला गल्ली, भोकरदन), शेख इस्राईल शेख इस्राईल (रा. म्हाडा कॉलनी, भोकरदन), पांडुरंग सखाराम सोनवणे (रा. वरुड बु.) आणि सागर केशवराव जाधव (रा. भोकरदन) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत, पोलीस अंमलदार किशोर मोरे, गणेश पिपळकर, अर्जुन टेकाळे, प्रदिप टेकाळे आणि होमगार्ड साजेद शेख यांच्या पथकाने केली.
भोकरदन शहरात अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी रणशिंग फुंकले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
शहरातील कारवाईने अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले
भोकरदन शहरात अवैध वृक्षतोड, अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक, जुगार अड्डा, अवैध देशीदारु विक्री यामुळे अवैध धंदे बोकाळले होते. भोकरदन पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यासाठी पाऊले उचलले आहेत. येत्या काळात शहरात कोणी अवैध धंदे करील, त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोनि. किरण बिडवे यांनी दिला आहे.