

वडीगोद्री ः तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गणेश कैलास मरकड या वाळू माफियांवर अंबड तालुक्यातील गोंदी पोलिसांनी कारवाई करीत त्याच्या विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
10 नोव्हेंबर 2025 रोजी कारवाई करण्यात आलेल्या वाळू माफियांवर गोंदी पोलिस ठाणे हद्दीतील 11 वाळूमाफियांवर हद्दपारचा प्रस्ताव मंजूर करून हद्दपारची कारवाई करण्यात आली होती. जालना जिल्हा हद्दपार असताना 13 जानेवारी रोजी वाळूमाफिया गणेश कैलास मरकड (रा. गोंदी) हा गोंदी हा विना क्रमांकाच्या लाल रंगाच्या ट्रक्टर व ट्रॉली घेऊन भाग्यनगरच्या दिशेने जाताना दिसला.
यावेळी गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक किरण हावले, पो कॉन्स्टेबल दिपक भोजने,शेख यांनी त्यास थांबण्यासाठी हात केला असता त्याने ट्रॅक्टर व ट्रॉली ही घेऊन भरधाव वेगात सार्वजनिक ठिकाणी ट्रॅक्टर पळवला. पोलिस पथकाने त्याचा पाठलाग केला असता त्याने ट्रॅक्टर भाग्यनगर येथे सोडून उसाच्या शेतीमध्ये तो पळून गेला. पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली.
तडीपार झालेल्या आरोपींवर लक्ष
सदरची कारवाई सपोनि आशिष खांडेकर व त्यांच्या पथकाने केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि एस.एम. मुपडे हे करीत आहेत. तडीपार इसमाच्या हालचालीवर पोलिस लक्ष ठेवून असल्याचे प्रभारी अधिकारी सपोनि आशिष खांडेकर यांनी सांगितले आहे.