

Pokera Scheme: Bribery for technical approval of warehouse construction?
जालना, पुढारी वृत्तसेवाः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (पोकरा टप्पा-२) गोडाऊन बांधकामाच्या तांत्रिक मान्यतेसाठी वखार महामंडळ, पुणे येथील कर्मचाऱ्यांकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांची सर्रास आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे वखार महामंडळाचे कनिष्ठ अभियंता अभिषेक रेळेकर हे 'शिव इंजिनिअरिंग सर्व्हिसेस' या खाजगी संस्थेच्या बँक खात्यावर १५ ते ३० हजार रुपये ऑनलाईन उकळत असल्याचा आरोप पुराव्यांसह समोर आला आहे. महामंडळाची ११,८०० रुपयांची पावती आणि खाजगी संस्थेला दिलेल्या रक्कमेसह एका इस्टिमेटसाठी शेतकऱ्यांना तब्बल ३० ते ३५ हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
त्रिगुणी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी लकडे यांनी व्हॉट्सअॅप चॅट, बँक ट्रान्सफर पावत्या आणि स्थानिक अभियंत्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचे ठोस पुरावे कृषी विभागाकडे सादर केले आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा नोडल अधिकारी सचिन पांचाळ यांनी पोकराच्या मुंबई प्रकल्प संचालकांकडे चौकशी व गुन्हे दाखल करण्यासाठी अहवाल सादर केला आहे.
अन्यथा मुंबईच्या कार्यालयासमोर आंदोलन
वखार महामंडळाची जाचक तांत्रिक मान्यतेची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे स्थानिक 'बांधकाम विभागा' मार्फत मंजुरी द्यावी, अन्यथा २६ सप्टेंबरपासून मुंबई पोकरा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी कंपन्यांनी दिला आहे.