

परतूर : तालुक्यातील वरफळ येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन शेतकऱ्यांचा आठ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत तीन तुषार संचांचेही नुकसान झाले आहे. स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वरफळ येथील शेतकरी रमेश रूपनर (गट क्रमांक १९४), संपत शिंदे आणि मधुकर शिंदे (गट क्रमांक १८४ व १८५) यांच्या शेतातील उसाला आग लागल्याने एकूण आठ एकरांवरील ऊस जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत तीन तुषार संचही जळून नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, या घटनेत शेतकऱ्यांच्या उभ्या ऊस पिकाचे आणि सिंचन साहित्याचे मोठे नुकसान झाले.
ऊस पिकासाठी लागवड, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत उभे पीक आगीत जळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच तीन तुषार संचांचे नुकसान झाल्याने सिंचन व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.