

हरुण कच्छी
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरातील शेतकऱ्यांवर यंदा निसर्गाने मोठे संकट ओढवले आहे. पावसाळा संपत आला तरी परिसरात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केली; मात्र पावसाने ऐन हंगामात दगा दिल्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची वाढ खुंटली असून अनेक शेतांतील पिके सुकून गेली आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्णपणे निसटल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. वेळेवर पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी आपल्या जवळची जमापुंजी खर्च करून शेतीची मशागत केली. महागडी बि- बियाणे खरेदी करून कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. पेरणीनंतर पिके उगवली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकांची वाढ थांबली.
पावसाळ्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी झाल्या असल्या तरी पिकांना आवश्यक असलेला दमदार पाऊस झालेला नाही. जमिनीतील ओलावा कमी होत गेल्याने पिके दिवसेंदिवस कोमेजत गेली. कापूस पिकाची वाढ खुंटली असून अनेक शेतांमध्ये कापसाला अपेक्षित बोंडेही आलेली नाहीत. सोयाबीनच्या झाडांची वाढ खुंटली असून शेंगा भरण्याच्या काळातच पाण्याअभावी मोठे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामात पाऊस न झाल्याचा परिणाम आगामी रब्बी हंगामावरही होण्याची दाट शक्यता आहे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्याने रब्बी पिकांची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांमध्येही अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध नसल्याने भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी आष्टी, पांडेपोखरी, परतवाडी, हास्तूरताडा, कार्हाळा, अकोली, ब्राह्मणवाडी, रायगव्हाण, फुलवाडी, पळसी, लोणी, संकनपुरी, पिंपळ धामणगाव, ढोणवाडी, आसनगाव, सातारा, वाहेगाव येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. केवळ कागदोपत्री सर्वेक्षण न करता प्रत्येक गावातील आणि प्रत्येक शेतातील प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून अहवाल तयार करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.