

Parsi Hill is being transformed into 'Oxygen Park'
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत असलेली पारशी टेकडी सध्या हिरवाईने नटली असून, पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक आदर्श उपक्रम म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातून या टेकडीवर आतापर्यंत ७० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात ही टेकडी 'ऑक्सिजन पार्क' म्हणून नावारूपाला येणार आहे. शिवाय, पशुपक्ष्यांचा अधिवास वाढल्यामुळे जैवविविधता टिकविन्यास मदत होणार आहे.
सध्या या भागात श्रावणात पडणाऱ्या पावसामुळे झाडे बहरली आहेत, तर टेकडीने जणू हिरवा शालू नेसल्याचे दृश्य पाहायला मिळते. फेज श्री जवळ वसलेली ही टेकडी सुमारे १०० एकर परिसरात पसरलेली असून, इथे सहा घनवन प्रकल्प आणि दोन अमृतवाटिका उभारण्यात आल्या आहेत.
या भागात आंबा, सीताफळ, जांभूळ यांसारखी फळझाडं मोठ्या प्रमाणात लावण्यात आली असून, त्यातील काही झाडांची उंची सध्या सहा फूटांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे सुमारे सात हजार आंब्याची झाडं यामध्ये समाविष्ट आहेत. झाडांची संख्या आणि विविधता वाढल्यामुळे टेकडी परिसरात पक्षी, वन्यजीवांचा नवा अधिवास तयार झाला आहे.
या उपक्रमात कुंडलिका-सिना रिज्युवनेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, समस्त महाजन ट्रस्ट, स्थानिक शासकीय अधिकारी, उद्य ोजक, तसेच शेकडो स्वयंसेवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग आहे. पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी आणि नागरिकांच्या श्रमदानातून हा परिसर हरितमय करण्यात मोठा वाटा उचलला आहे. तसेच टेकडीवर तार कंपाउंड, पाणलोट क्षेत्र विकास, रस्ते बांधणी, आणि खदानीतून टेकडीवर पाणी आणण्याचे प्रयत्न यशस्वीपणे राबवले गेले आहेत.
यावर्षी माजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत ड्रोनच्या सहाय्याने बीजारोपण करण्यात आले होते. त्यामुळे टेकडीचे जैवविविधतेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या हरित उपक्रमामुळे टेकडी आता पर्यावरण रक्षणाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही पुढे येत आहे. पारशी टेकडीवरील उपक्रम हे पर्यावरण संवर्धनासाठीचे जिवंत उदाहरण आहे. शासकीय यंत्रणा आणि सामाजिक सहभाग यांचा उत्तम मेळ साधल्यास कोणताही परिसर हरित, रमणीय आणि उपयुक्त बनू शकतो, हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.