

Outbreak of red and black rot disease in cotton
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची पाने लाल पडली असून त्यांची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर त्यांना कैऱ्या लागण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे त्यामुळे उत्पन्नात घट येणार असून केलेला खर्च आणि जाण्याची शक्यता आहे.
सुरुवातीपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे व मध्यंतरी पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. त्यामुळे कपाशीत मोजकीच बोंडे तयार झाली होती. परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके पावसामुळे वाया गेली आहेत. या परिस्थितीतून देखील काही शेतकऱ्यांची पिके कशीबशी वाचली आहेत. मात्र, या वाचलेल्या पिकांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव होतोना दिसत आहे. तालुक्यात काही ठिकाणी कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कपाशीच्या पिकांवर लाल्या रोगाने आक्रमण केल्यामुळे कपाशीच्या झाडाची पाने गळत आहेत. अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी आता या रोगाच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत दिसत आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी आणि मका मोठे नुकसान झाले आहे. यातून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठी काळजी घेऊन कपाशीची रोपटे कशीबशी वाचवली होती. दरवर्षी शेतकऱ्यांना एकरी पाच ते सहा क्विंटल उतारा निघत असतो. आता मात्र, शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.