

रवींद्र देशपांडे
भोकरदन तालुक्यातील गोषेगाव येथील निजामकालीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून डोक्यावर सुरक्षित छत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा शाळेच्या आवारात झाडाखाली भरते.
निजामकालीन मोडकळीस आलेल्या शाळेच्या खोल्या पडण्याच्या स्थितीत असूनही अजूनही त्या पाडण्यात आलेल्या नाहीत. याचबरोबर नवीन वर्गखोल्यांची मान्यता आणि निधी मिळालेला नाही. शाळेच्या सर्व खोल्या मोडकळीस आल्यामुळे पावसाळ्यात छतांमधून पाणी गळते, भिंती तुटल्या आहेत.
मुलांना बसायला टेबल-खुर्चा तर दूरच, चटईसुद्धा उपलब्ध नाही. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिक्षणाधिकारी भागवत यांनी दोन महिन्यांपूर्वी भेट दिली होती. पुढे काहीच झाले नाही.