

वाटुर (जालना) : मिनी मंत्रालय म्हणून समजले जाणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भावी उमेदवारांचे लक्ष गटाच्या आर-क्षणाकडे लागले आहे. मंठा व परतूर तालुक्यातील वाटूर हे दोन्ही तालुक्यांचे सेंटर आहे. वाटूर जिल्हा परिषद गटातील राजकीय आखाड्यातील संभाव्य उमेदवार वाटूरचा असावा अशी ठिकठिकाणी चर्चा रंगत आहे.
वाटूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार सत्ताधारी पक्षाने स्थानिक द्यावा म्हणून जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून लोणीकर समर्थक परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती संभाजी वारे यांच्यासह अनेकांनी वर्षभरापासून जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीकडून त्यांचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव घेतले जाते.
आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाटुर येथे मोठा जनसंपर्क असून वाटूर येथे त्यांचे नातेसंबंध व कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे तसेच या गटातील अनेक गावचे सरपंच भारतीय जनता पार्टीचे असून गेल्या दहा वर्षांपासून भाजपाचे उमेदवार या गटात विजय होत आले आहे तसेच माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते सुरेश जेथलिया यांनीदेखील जोरदार मोर्चे बांधणी केली असून त्यांचाही चांगला जनसंपर्क आहे. उबाठा, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांनी आपले उमेदवार आगामी निवडणूक लढवणार असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार यात शंका नाही तर पैशाच्या जोरावर मतदान विकत घेऊन निवडणूक जिंकू असे अपक्ष उमेदवाराचे समर्थक बोंब ठोकताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार असल्यामुळे भाजपा समोर मोठे आव्हान निर्माण झाले. मराठा ओबीसी आरक्षणवाद तापल्याने निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही या गटात २२ गावी असून २५ हजारांच्या जवळपास मतदार आहे त्यामध्ये सर्वाधिक मराठा मतदार असून त्या खालोखाल ओबीसी, दलित, मुस्लिम मतदार आठ ते नऊ हजारांच्या जवळपास आहे. येणार वेळच सांगणार कुणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडणार आहे.
स्थानिक उमेदवार द्यावा
वाटूरगाव मोठ्या लोकसंख्येचे असून पाच हजारांच्या जवळपास मतदार असल्यामुळे स्थानिक उमेदवार देण्याची जोर धरत आहे. यामुळे ओबीसी, दलित, मुस्लिम मतदारांना गावातील मुद्द्यावर एक संघ होण्यासाठी वाटूरकरांना अवघड नाही यामुळे वाटूरचा स्थानिक उमेदवार भारी पडू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू आहे.