

Moka clause in the case of entering the house and demanding ransom from the merchant
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या आस्था हॉस्पिटलच्या बाजूला राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरात घुसून त्याला पिस्तुलचा धाक दाखवित चार लाखाची खंडणी घेणाऱ्या आरोपीवर सदर बाजार पोलिसांनी मोक्का कलमातंर्गत कारवाई केली आहे.
जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात राहणारे किराणा व्यावसायिक चंदन वसंतीलाल गोलेच्छा यांचे बदनापुर तालुक्यातील दाभाडी येथे किराणा दुकान आहे. २९ मे २०२५ रोजी ते दाभाडी येथील किराणा दुकान बंद करुन दुचाकीवर घरी आले असता आरोपी विठ्ठल भिमराव अंभोरे, अक्षय रविंद्र गाडेकर व राहुल रत्नाकर गंगावणे यांनी त्याच्या घरात घुसुन त्यांना पिस्तुलचा धाक दाखवित त्यांच्याजवळून ४ लाखाची खंडणी घेतली व ४६ हजार रुपये दिले नाहीत तर तुझ्या परिवाराला जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती.
या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात ३१ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महिला पोलिस उपनिरीक्षक दिपाली शिंदे यांनी आरोपींना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपर्यांना पोलिस कोठडी ठोठावली होती. आरोपींकडून पोलिसांनी २ पिस्तुल, २ जिवंत काडतुस, १ दुचाकी, ३ मोबाईल असा २ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता.
जालना शहरातील चंदनझिरा भागातील सुंदरनगर भागात राहणारा आरोपी विठ्ठल भिमराव अंभोरे याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा पोलिस ठाणे, सिल्लोड पोलिस ठाण्यात संघटीत गुन्हे दाखल असल्याचे आढळुन आले. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या परवानगीने मोका कलम अंतर्भुत करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी हे करीत आहेत.
सदरची कामगीरी विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर, परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर रविंद्र मिश्र, जालना पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे, महिला पोलिस उपनिरीक्षक दिपाली शिंदे, पोउपनि संजय गवई, जमादार भरता ढाकणे, बाबासाहेब हरणे, जैवाळ, म्हस्के, प्रदीप करतारे यांनी केली.