

MLA Lonikar raised the issue of employee pay scale and vacant posts in the Legislative Assembly.
परतूर, पुढारी वृत्तसेवा : भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न आणि रिक्त पदांमुळे रखडलेली मोजणीची कामे यावरून आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूच-नेद्वारे सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) आदेश देऊनही शासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे लोणीकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.
आमदार लोणीकर म्हणाले की, भूमी अभिलेख विभागाचे काम अत्यंत तांत्रिक स्वरूपाचे असूनही कर्मचाऱ्यांना योग्य वेतनश्रेणी मिळत नाही. मॅटच्या नागपूर खंडपीठाने २४ जानेवारी २०२० रोजी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच जून २०२५ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत महसूल मंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. न्याय मिळत नसल्याने कर्मचारी कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, शासनाने तातडीने अध्यादेश काढून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
जालना जिल्ह्यातील बिकट परिस्थिती मांडताना लोणीकर यांनी सांगितले की, परतूर, मंठा, जाफराबाद आणि बदनापूर या तालुक्यांमध्ये वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. यामुळे पाणंद रस्ते, शेततळे, पाझर तलाव आणि ड्रोन सर्वेक्षणाची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांनी मोजणीसाठी भरलेले पैसे आणि दिलेले अर्ज प्रलंबित असून त्यांना मालकी हक्क मिळण्यास विलंब होत आहे.
रिक्त पदे तातडीने भरून मोजणीची प्रक्रिया गतिमान करावी आणि कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात, अशी आग्रही मागणी लोणीकर यांनी यावेळी केली.
कार्यालयातील रिक्त पदांची स्थिती
परतूर, जाफराबाद व बदनापूर येथे ३ टीएलआर पदे रिक्त
मंठा तालुका: क्लास श्री आस्थापना: २२ पदे
कार्यरत कर्मचारी : ९ रिक्त पदे : १३
परतूर तालुका : क्लास श्री आस्थापना: २२ पदे
कार्यरत कर्मचारी: १५ रिक्त पदे : ७