

MLA Danve Takes Aggressive Stance Against Tree Felling
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन व जाफराबाद तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार संतोष पाटील दानवे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आणि अवैध वृक्षतोड करणाऱ्या एकाही गुन्हेगाराला सोडू नका, त्यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करा, 'असे निर्देश दिले आहेत.
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील काही भागांत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करून लाकडाची अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून, स्थानिक नागरिकांनी याबाबत आमदार संतोष दानवे यांच्याकडे धाव घेतली होती.
त्या अनुषंगाने आमदार संतोष दानवे यांनी या तक्रारीची गांभीर्यान दखल घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, झाडे लावून ती जगवणे ही काळाची गरज आहे. मात्र, काही लाकूड माफिया स्वतःच्या फायद्यासाठी झाडांची अवैध कत्तल करत आहेत. अशा प्रवृत्तींमुळे भविष्यात पाणीटंचाई आणि उष्णतेच्या लाटेसारखी संकटे ओढवतील.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत बोललो असून, गस्त वाढवण्याच्या आणि अशा माफियांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आ. संतोष दानवे यांनी नागरीकांना आवाहन केले की, कुठेही अवैध वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासन किंवा संपर्क कार्यालयाला कळवावे.
प्रशासनाला सूचना
वनविभागाने विशेष पथके तयार करून संवेदनशील भागात २४ तास गस्त घालावी, लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी आणि विनापरवाना वाहतूक आढळल्यास वाहन जप्त करावेख, केवळ दंड न आकारता संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश आ. दानवे यांनी दिले आहेत.