

पूर्णा : तालुक्यातील गौर येथे रस्त्यावर मोटारसायकल उभी करून वाढदिवस साजरा करण्याच्या क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या वादाने थेट रक्तंरजित वळण घेतल्याची धक्कादायक घटना घडली. कत्तीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून घटनेनंतर संतप्त जमावाने एका स्कॉर्पिओ वाहनास पेटवून दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले.
सदर घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री साडे नऊ ते दहा वाजता गौर येथील जुन्या बसस्थानक परिसरात घडली. गौर गावातील काही युवकांनी रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी आडवी उभी करून वाढदिवस साजरा सुरू केला होता. याचवेळी त्या मार्गाने जाणाऱ्या पानटपरी चालकाने रस्ता मोकळा ठेवण्याची विनंती केली. मात्र या साध्या सूचनेवरून संतप्त युवकांनी शिवीगाळ करत वादाला सुरुवात केली. वाद चिघळत गेला आणि काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून तसेच जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून आरोपींनी थेट कत्ती काढत गोरक्षनाथ उर्फ रामा पारवे या युवकावर सपासप वार केले.
या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची समजते. दरम्यान घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. संतप्त जमावाचा रोष अनावर झाला आणि तिथे उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी लक्ष्य बनली. काही क्षणांतच वाहनाला आग लावण्यात आली आणि पाहता पाहता गाडी जळून खाक झाली. या दुहेरी घटनेमुळे गौर गावात भीती आणि तणावाचे सावट पसरले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला.
सध्या गावातील संवेदनशील ठिकाणी पोलीस तैनात असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती चुडावा पोलीस ठाण्यात मिळताच पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, सपोनि सुशांत किनगे, गजानन मोरे, स्वामी यासह पोलीस फौजफाटा तैनात झाला अन् परिस्थिती नियंत्रणात आणली. तद्नंतर शनिवारी (दि. १८) चुडावा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुशिल उर्फ काली केशव पारवे यांच्या फिर्यादीवरून संतोष बालाजी सावळे, सुजित बालाजी सावळे, बालाजी संभाजी सावळे, मंगेश बालाजी सावळे व योगेश चांदू अंभोरे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेमुळे गावातील वातावरण ढवळून निघाले असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली.